12.27 टक्के विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाकडे पाठ, राज्यातील 1 लाख 66 हजार 425 जागा रिक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे एकूण 4 लाख 19 हजार 230 (87.73 टक्के) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अद्याप राज्यात अकरावीच्या 1 लाख 66 हजार 425 जागा रिक्त असून या जागा भरण्यासाठी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेशाची संधी देण्यात आली आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे 21 ऑक्टोबरपर्यंत झालेल्या प्रवेशाची माहिती शिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाइन अर्ज केलेल्या राज्यातील 58 हजार 646 (12.27 टक्के) विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत अथवा त्यांना प्रवेश मिळालेला नाही. पाच महापालिका क्षेत्रांत अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या 1 हजार 667 कॉलेजमधील एकूण 5 लाख 85 हजार 655 जागांसाठी 4 लाख 77 हजार 876 विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक होते. त्यापैकी 4 लाख 19 हजार 230 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

मुंबई विभागात सर्वाधिक प्रवेश
मुंबई महापालिका क्षेत्रात अकरावीचे सर्वाधिक 90.6 टक्के प्रवेश झाले आहेत. विभागात अकरावीच्या 3 लाख 75 हजार 195 जागा उपलब्ध होत्या. तर एकूण 2 लाख 76 हजार 119 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या प्रवेशानंतर अकरावीच्या 99 हजार 76 जागा (26.41 टक्के) रिक्त राहिल्या असून 28 हजार 636 (9.4 टक्के) विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेले नाहीत.

इतर विभागांतील प्रवेशाची स्थिती
विभाग इनटेक प्रवेश रिक्त प्रवेश
घेतले जागा घेतले नाहीत
पुणे 1,11,990 78,924 33,066 16,193
नाशिक 26,480 18,677 7803 6954
नागपूर 55,800 34,886 20,914 4896
अमरावती 16,190 10,624 5566 1967

अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्याने अकरावीत प्रवेश घेणे, अन्य ठिकाणी प्रवेश रद्द करणे, स्थलांतर व इतर वैयक्तिक कारणांमुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा अकरावी प्रवेश राबविण्यात येत आहे. 15 व 16 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरायचा आहे. अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालक स्तरावरून कॉलेज अॅलॉट होणार आहे.