
सामना ऑनलाईन, मुंबई
११ वर्षांच्या मुलाच्या स्प्लीनमधून म्हणजेच टिल्ली या अवयवातून तब्बल १२ सेंमी लांबीचा ट्युमर काढण्यात आला. ही अतिशय अवघड शस्त्रक्रीया शुश्रुषा हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवली. तीन तास ही शस्त्रक्रिया चालली. या मुलाच्या पोटातील स्प्लीन या अवयवात १२ सेंमी लांबीचा ट्युमर असल्याचे निदान झाले. त्यानंतर लगेचच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकर निदान झाले नसते तर या मुलाच्या जीवावर बेतले असते असे डॉक्टरांनी सांगितले.
बालरोगतज्ञ डॉ.राजीव रेडकर आणि डॉ.एम.आर लोकेश्वर या दोन डॉक्टरांनी ही शस्त्रक्रीया केली. संबंधित मुलगा डॉ. लोकेश्वर यांच्याकडे पोटात दुखत असल्याची तक्रार घेऊन आला होता. त्याची तपासणी केली असता त्याच्या पोटात ट्युमर असल्याचे निदान झाले. हा ट्युमर जन्मजातच होता. या शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला तर रुग्ण दगावण्याची शक्यता असते. परंतु, रक्तस्राव थांबवून यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचे कठीण आव्हान दोघा डॉक्टरांनी पेलले. अशाप्रकारची पहीलीच केस शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये आली होती. वेळीच उपचार केले नसते तर संबंधित मुलाला कर्करोग होऊन संसर्ग होण्याची शक्यता होती असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, डॉ. रेडकर आणि डॉ. लोकेश्वर यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत अशी केस दुसर्यांदा पाहिल्याचे सांगितले.
हा ट्युमर कशामुळे होतो
मटण नीट न शिजवता ते खाल्ल्यास या मटणातील जंतू पोटातील एखाद्या अवयवात जाऊन त्या ठिकाणी ट्युमर वाढतो. एखाद्या गर्भवतीने असे मटण खाल्ल्यास तिच्या बाळाला हा ट्युमर होऊ शकतो. ८०० केसेसमधील ५०० केसेसमध्ये अशाप्रकारचा ट्युमर होण्याची शक्यता असते. हा ट्युमर कुठल्याही वयात होऊ शकतो. भूक न लागणे, सतत चिडचिड ही या ट्युमरची लक्षणे आहेत.
संपुर्ण स्प्लीन हा अवयव न काढता शस्त्रक्रिया
स्प्लीन या अवयवामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. लहान मुलांच्या पोटातील या अवयवाला इजा झाल्यास मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊन संबंधित मुल दगावूही शकते. परंतु, डॉक्टरांनी या अवयवाच्या ज्या भागात ट्युमर होता तोच भाग रक्तस्राव थांबवून यशस्वरित्या बाजूला करून ट्युमर बाहेर काढला. दरम्यान,अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर जोखीम असते.






























































