
गुरुग्राममध्ये एका 15 वर्षांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलीवर एक वर्षांच्या बाळाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत जबर जखमी झालेलं बाळ सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या बाळाच्या 4 बरगड्या तुटल्या असून, यकृत आणि स्वादुपिंडाला जबर इजा पोहोचली आहे. पोलिसांनी बाळाला जबर जखमी केल्याचा आरोप असलेल्या मुलीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नाही तर पोलिसांनी या मुलीला कामावर ठेवणाऱ्या बाळाच्या आईवडिलांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. ही मुलगी अल्पवयीन असून लहान मुलांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे.
सोमवारी बाळाचे आईवडील बाजारात गेले होते आणि 15 वर्षांची मुलगी त्यांच्या बाळाची काळजी घेत होती. या मुलीच्या कडेवरून बाळ ‘चुकून पडल्याने’ ते जोरात रडायला लागलं होतं. बाळाला शांत करण्याचा मुलीने प्रयत्न केला, मात्र ते रडायचं थांबतच नव्हतं. यामुळे घाबरलेल्या मुलीने बाळाला लाथाबुक्क्यांनी तुडवलं असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. बाळाचे आईवडील जेव्हा बाजारातून घरी आले तेव्हा त्यांना बाळाचा जोरजोरात रडण्याचा आवाज येत होता. जेव्हा त्यांनी बाळाला पाहिलं तेव्हा त्यांच्या काळजात धस्स्स.. झालं. त्यांनी तातडीने बाळाला रुग्णालयात दाखल केलं. पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं असून तिला फरिदाबादमधील निरीक्षणगृहात ठेवण्यात आलं आहे. तिने ज्या बाळाला मारहाण केली होती, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
बाळाच्या वडिलांनी या प्रकाराबाबत बोलताना सांगितले की त्यांच्या घरी काम करणाऱ्या आचाऱ्याने या मुलीबाबत आम्हाला माहिती दिली होती. त्याच्या सांगण्यावरूनच आम्ही या मुलीला कामाला ठेवलं होतं. आम्ही या मुलीला चांगली वागणूक दिली होती आणि तिला कधीही त्रास दिला नव्हता असंही बाळाच्या वडिलांनी सांगितलं आहे. ही मुलगी कधीही चिडचिड करत नव्हती आणि बाळाची ती नीट काळजी घेत होती असं वडिलांनी म्हटलं आहे. हे जोडपं घराबाहेर जाताना बाळाला सोबत घेऊन जायचं मात्र सोमवारी ते झोपलेलं असताना हे दोघेच जण बाहेर गेले होते.

























































