
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दादर चैत्यभूमीवर त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी यंदा मोठी गर्दी उसळली होती. कोरोनामुळे दोन वर्षे घरातच जयंती साजरी करण्याची नौबत आल्यानंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या जयंती साजरी होत असल्याने भीम अनुयायांमध्ये यंदा मोठा उत्साह संचारला होता. मुंबई शहर आणि उपनगरात जयंतीनिमित्त विविध समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात दरवर्षी लागणाऱया पुस्तकांचे, बाबासाहेब आणि गौतम बुद्धाच्या तसबिरींचे आणि मूर्तींचे स्टॉल्स गर्दीने फुलून गेले होते.
दलित, शोषित, वंचित आणि कष्टकऱयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या महान मुक्तिदात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मुंबई, नागपूर आणि देशभरातच भीम जयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे घरीच जयंती साजरी करण्याची वेळ आली होती. यंदा मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्याने मोठय़ा उत्साहात जयंती साजरी केली गेली. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प वाहण्यासाठी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. या रांगा इंदू मिलपर्यंत गेल्या होत्या.
दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना विविध पक्षांच्या नेत्यांनी अभिवादन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर आदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, आमदार भाई जगताप, नाकाxटिक्सचे अधिकारी समीर वानखेडे यांनीही डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी ‘चित्रपटातील बाबासाहेब’ या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही गर्दी झाली होती. तसेच बाबासाहेबांवरील एका कॉफीटेबल बुकचेही यावेळी प्रकाशन
करण्यात आले.



























































