सामना प्रतिनिधी । धाराशिव
धाराशिव लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी ५ व काल गुरुवार, २८ मार्च रोजी एक उमेदवार असे एकूण ६ उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज काढून घेतल्याने निवडणूक रिंगणात एकूण १४ उमेदवार शिल्लक आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघात एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यावेळच्या निवडणूकीत एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असले तरी खरी लढत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात होणार आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शुक्रवार, २९ मार्च या दिवशी अतुल विक्रम गायकवाड, अर्चना राणाजगजितसिंह पाटील, काकासाहेब बाबुराव राठोड, नवनाथ दशरथ उपळेकर व बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे या पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर काल गुरुवार, दिनांक २८ मार्च रोजी सुशिलकुमार दत्तात्रय जोशी या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. एकूण २० उमेदवारापैकी ६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणूक रिंगणात आता एकूण १४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
आता निवडणूक रिंगणात महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह बहुजन वंचित विकास आघाडीचे अर्जुन सिद्राम सलगर, बहुजन समाज पार्टीचे डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमान तर अपक्ष सर्वश्री दिपक महादेव ताटे, आण्णासाहेब रामचंद्र राठोड, विश्वनाथ सदाशिव फुलसुरे, तुकाराम दासराव गुंगावणे, जगन्नाथ निवृत्ती मुंडे, सय्यद सुलतान लडखॉन, डॉ. वसंत रघुनाथ मुंडे, नेताजी नागनाथ गोरे, शंकर पांडूरंग गायकवाड व आर्यनराजे किसनराव शिंदे असे एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
वरनाळे यांचा उमेदवारी अर्ज मागे, विरोधकांची हवा गुल
खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वरनाळे यांच्या उमेदवारी अर्जामुळे शिवसेनेतील गटबाजीचा आपणास फायदा होणार, अशी आशा विरोधकांना होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बसवराज वरनाळे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यासह आपला उमेदवार अर्ज मागे घेतल्यामुळे विरोधकांच्या फुग्यातील हवाच निघून गेली आहे.

































































