
राज्यात गेल्या 24 तासांत 14 हजार 976 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 13 लाख 66 हजार 129 वर पोहचली आहे. दिवसभरात एकूण 19 हजार 212 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 66 लाख 98 हजार 024 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी एकूण 13 लाख 66 हजार 129 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईत दिवसभरात 1,713 कोरोना रुग्ण
मुंबईत दिवसभरात 1,713 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एपूण 2,319 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 1 लाख 67,202 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 49 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 49 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 8 हजार 880 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 66 दिवसांवर पोहोचला आहे.































































