स्टुडेंट्स ऑफ द इयर… 15 मेंढ्यांचा शाळेत प्रवेश, वाचा कारण

80

सामना ऑनलाईन । पॅरिस

‘कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा…’ हे बालगीत तुम्ही ऐकलच असेल. पण खरंच प्राण्यांना शाळेत प्रवेश मिळाला तर? हिंदुस्थानात नाही तर फ्रान्समध्ये हे सत्यात उतरलं आहे. इथल्या मेढ्यांना शाळेत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थांसोबतच मेढ्याही शाळेत दिसणार आहेत.

फ्रान्समधील फ्रेंच अॅल्प्स भागातील क्रेट एन बॅलेडॉन (Crts en Belledonne) येथील शाळेत मंगळवारी एक स्थानिक धनगर आपल्या कुत्र्यासह 50 मेढ्यांना घेऊन शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आला. त्यातील 15 मेढ्यांना त्यांचे जन्मदाखले असल्याने अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला. हे वाचून आश्चर्य वाटेल पण, शाळेतील वर्गांची संख्या कमी होऊ नये यासाठी हा प्रयत्न तिथल्या पालकांकडून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या 266 वरून 261 आल्याने शाळेतील 11 वर्गांपैकी एक वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसे होऊ नये यासाठी घाबरलेल्या या पालकांनी ही शक्कल लढवली आणि प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी चक्क मेढ्यांना प्रवेश मिळवून दिला, ज्यामुळे पटसंख्या वाढलेली दिसेल.

अर्थात शाळेत मेंढ्यांना पाहून शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना कौतुक वाटत होते. ‘आता तरी शाळेतील वर्ग कमी केले जाणार नाहीत’, अशी प्रतिक्रिया गायल लवाल या पालकाने यावेळी दिली. या प्रकारानंतर तरी फ्रान्समधील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील, असा टोला त्यांनी लगावला. तसेच इथल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शैक्षणिक दर्जापेक्षा विद्यार्थ्यांच्या आकड्यांची चिंता अधिक वाटू लागल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या