
बेकायदेशीरपणे गावठी बॉम्ब बाळगल्या प्रकरणात संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे मराठवाडी देवरुख येथून सुरेश आत्माराम किरवे (वय 48) या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याच्याकडे 9 हजार रुपये किमतीचे 18 गावठी बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे देवरुख परिसरात खळबळ उडाली आहे.
जिवंत गावठी बॉम्ब बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेऊन मानवी जीवितास तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण केला म्हणून या संशयितावर देवरुख पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात फिर्याद आशिष वसंत शेलार, पोहेकॉ दहशदवाद विरोधी पथक यांनी दिली आहे. ही कारवाई दहशदवाद विरोधी पथक व बॉम्ब शोध व नाशक पथक यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात आली आहे. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अनधिकृत धंद्यांवरही पोलिसांचे धाडसत्र सुरु आहे.




























































