नगरमधील राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक बडतर्फ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

नगर महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून भाजपला मतदान करणाऱया नगरमधील 18 नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्याचवेळेस जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे.

नगर महापालिकेत महापौरपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना मतदान केले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू असताना नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला मतदान केले.

त्याची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत दिले होते. पक्षादेश झुगारल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. पण नगरसेवकांनी नोटीसला उत्तर न दिल्यामुळे खुलासा केला नाही. त्यामुळे या 18 नगरसेवकांवर बडतर्फीची कारवाई करण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी घेतला. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँगेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नगरसेवकांचे नेतृत्व करणारे आमदार अरुणकाका जगताप व संग्राम जगताप ही पितापुत्रांची जोडी पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.