
सामना प्रतिनिधी । राहाता
नगर जिल्ह्यातील राहाता येथे मकरसंक्रांत सणाला गालबोट लागले आहे. येथील शनिचौक परिसरात घराच्या छतावर पतंग उडवताना विजेच्या तारेचा धक्का लागून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला तसेच एक जण जखमी झाला. तुषार वाडीले असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.
मकरसंक्रात सणामुळे शहरात सर्वत्र पतंग उडवण्याची धूम सुरू आहे. तुषार चंपालाल वाडीले हा 12 वीत शिकत असलेला तरूण व त्याचे चार पाच मित्र मामाच्या घरावर पतंग उडवीत असताना छतावरून गेलेल्या विजेच्या तारांना चिकटला. बरोबर असलेल्या मित्रांनी त्याला दुर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का लागून किरकोळ जखमी झाले. तशाही अवस्थेत त्यांनी त्याला विजेच्या तारांपासून दूर केले व तातडीने शिर्डी संस्थान सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तुषारला मृत घोषीत केले. तर योगेश शिवदे हा तरुण किरकोळ जखमी झाला.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा
मयत तरूण हा एकुलता एक होता व आई जवळ राहात होता. या घटनेमुळे शनिचौक परिसरात शोककळा पसरली असून राहाता पोलिसांना घटनेची माहिती कळताच स.पो.नी. पाटील, पोहेकॉ शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.





























































