
सामना ऑनलाईन । पुणे
हडपसर येथील म्हाडा कॉलनी परिसरात २२ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील नागरिकांना सकाळी नऊच्या सुमारास काही कुत्रे मृतावस्थेत आढळली असल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. २२ कुत्र्यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खाण्यातून विष देऊन अथवा विषबाधा झाली असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. कुत्र्यांचा अचानक संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यामुळे त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल. पुढील कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





























































