
सामना ऑनलाईन । कोची
केरळमधील थ्रिसूर येथे एका महाविद्यालयीन तरुणीला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नितीश (32) याला अटक केली आहे. नितीश हा गेल्या काही दिवसांपासून तिला लग्नाची मागणी घालत होता. मात्र तिने लग्नाला नकार दिल्यामुळे त्याने तिला जिवंत जाळल्याचे समजते.
पीडित तरुणी ही तिच्या आजी आजोबांसोबत राहायची. तिचे वडिल त्यांना सोडून निघून गेले होते तर काही वर्षांपूर्वी तिच्या आईचे निधन झालेले. सध्या तरुणी थ्रिसूर महाविद्यालयात इंजिनिअरींचे शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून नितीश हा तिला लग्नाची मागणी घालत होता. मात्र पीडित मुलीने त्याला नकार दिला होता. बुधवारी दुपारी नितीश पेट्रोलचा कॅन घेऊन तिच्या घरात घुसला. त्यावेळी ती तरुणी व तिची आजी दोघीच घरात होता. तिथे पुन्हा नितीशने तिला लग्नाची मागणी घातली मात्र तिने नकार दिल्यानंतर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे धावत आले व त्यांनी नितीशला पकडले. दरम्यान तरुणीचा होरपळून मृत्यू झाला होता.
























































