
पंजाबमधील सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. मोहालीच्या सेक्टर-67 मध्ये एका 25 वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा तरुण त्याच्या मित्रांसोबत पार्टीला गेला होता, मात्र सकाळी त्याचा मृतदेह कारमध्ये आढळून आला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती तसेच गाडीची काच तुटलेल्या अवस्थेत होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. घटनास्थळी तरुणाच्या हातात एक पिस्तूलही सापडले आहे.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना कार रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसली. तेथे गर्दी जमली होती. तरुणाच्या डोक्यात गोळी लागली होती आणि त्याच्या हातात पिस्तूल होते. तसेच त्या तरुणाच्या नाकातून रक्त येत होते. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
मृत तरुण चंदिगडचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी तो रात्री बाहेर गेला होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्यासोबत त्याचे इतर मित्रही होते. कुटुंबीयांनी सांगितले की, कर्ण रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही तेव्हा त्याच्या आईने त्याला फोन केला. यावेळी सकाळपर्यंत घरी येईन, असे सांगितले. त्याने आईला जेवण करून झोपायला सांगितले.
कर्ण आधी बँकेत काम करत होता, काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती आणि वडिलांसोबत व्यवसाय सांभाळू लागला होता. त्याच्या मित्रांना चौकशीसाठी बळावले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
























































