
सामना प्रतिनिधी । जळगाव
हवामान बदलाचा अभ्यास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ‘ अर्थात पोकरा योजनेमध्ये जळगाव व धरणगाव तालुक्यातील २८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बळीराजाला या माध्यमातुन विशेष भेट दिली आहे. अल्पभुधारक शेतकऱ्यांना वरदान ठरणारी सदरची योजना अधिकारी, कृषी विभागाचे अधीकारी व शेतकरी यांनी समन्वयाने यशस्वी करण्याचे आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार व मंत्रीपदाच्या माध्यमातुन सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले आहेत. अल्पभुधारक कोरडवाहु शेतकऱ्यांना पावसाळी पाण्यावर अवलंबुन राहावे लागते. मात्र हवामानात झालेल्या बदलामुळे पावसाचे प्रमाण कमीअधिक होत असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीला सामोरे जावे लागते. या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ‘ राज्यातील १५ जिल्ह्यातील ५ हजार १४२ गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील पन्नास टक्क्याहुन अधिक लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबुन आहे. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास सर्वस्वी आणि पावसावर अवलंबुन असल्यामुळे त्यात मोठे चढउतार दिसुन येतात. याबाबत शासनाने वातावरणीय बदल कृती आराखडा तयार केला असुन त्यामध्ये हवामानातील दीर्घकालीन संभाव्य प्रतिकुल परिणामांचा वेध घेतलेला आहे. सदर आराखड्यामध्ये कृषी व जलक्षेत्रावर होणाऱ्या परिणामांचा उहापोह करून त्यास सामोरे जाण्यासाठी उपाययोजना सुचविन्यात आल्या आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये ५ हजार १४२ गावांचा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. सदर गावांची निवड लघुपाणलोट आधारित करण्यात आलेले आहे. हवामान बदलास असुरक्षितता संवेदनशीलता आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता यांच्या एकत्रित निर्देशांकानुसार गाव समूह निश्चित करण्यात आलेले आहेत. शासनाने कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णय दि. १७ जानेवारी २०१८ नुसार ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ ची स्थापना केली असुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविले आहे. सदर योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी संजीवनी समितीचीही स्थापना करण्यात येत असुन जळगाव व धरणगाव तालुक्यात २८ गावांची निवड करण्यात आलेली आहे.
यात जळगाव तालुक्यातील असोदा, भादली बु, मन्यारखेडा, वडनगरी, तरसोद, कुसूंबा, ममुराबाद या गावांचा समावेश आहे. धरणगाव तालुक्यातील सावर्डे बुद्रुक, गंगापूर बु., अनोरे, बाभळे बु., भामर्डी, धानोरे, गंगापुरी, गारखेडे, हनुमंत खेडे, पष्टाणे बु., तरडे, पष्टाणे खु., उखळवाडी, वाघळुद, भोणे, बिलखेडे, गोंदेगाव, जांभोरे, कडारी, महांकाळे, साखरे, सारवे व शामखेड या २२ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुळे शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवुन घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करणे सहाय्य करणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे.पोकरा ही योजना मुख्यत्वे अल्प, अत्यल्प भूधारक शेतकयांसाठी आहे. या योजनेत शेतकत्र्यांना फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड, शेततळे, पंपसंच, पाइप, तुषार / ठिबक संच, पोली हाउस, शेडनेट हाउस, शेततळे अस्तरीकरण इत्यादी घटक तसेच शेतमजुर, भूमिहीन शेतकरी, विधवा, परितकट्या स्त्रियांसाठी शेळीपालन, कुकुट पालन, मधुमक्षिकापालन इत्यादी घटकांकरीता ५० टक्के अनुदानावर लाभ देण्यात येणार असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.































































