नॉर्वेमध्ये सापडले 3 हजार वर्षांपूर्वीचे बूट! बर्फ वितळल्याने लागला शोध…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नॉर्वेमध्ये जगातील सर्वात प्राचीन बूट सापडले आहेत. सापडलेले हे बूट सुमारे 3 हजार वर्षापूर्वीचे आहेत. हे बूट कांस्य युगातील असावेत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दशकात येथील पहाडांवरील बर्फ वितळल्याने अनेक प्राचीन वस्तू सापडत आहेत. त्या प्राचीन वस्तूपैकीच आता 3 हजार वर्षापूर्वींचे बूट सापडले आहेत,असे नार्वेतील साइंस अँड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हा बूट 2007 मध्ये दक्षिण नॉर्वेमधील जोतुनहेमेन या पहाडी भागात सापडला होता. हा चामड्याचा बूट एखाद्या महिलेचा किंवा तरुणाचा असल्याचा अंदाज आहे. या बूटाजवळच काही बाण आणि कुदळही सापडली होती. त्यामुळे त्या काळात शिकारीसाठी हा चांगला भाग असावा, त्या काळात या भागात चांगली आणि मोठ्या संख्येने शिकार मिळत असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. हा बूट इसवीसनपूर्व 1100 च्या काळातील असावा, तसेच नॉर्वेतील हा सर्वात प्राचीन बूट असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

येथील विशिष्ट प्रकारची माती आणि हिमनगाखाली दबलेल्या या वस्तू आजही सुस्थितीत आहेत. येथे सापडलेली हत्यारे, कपडे, वनस्पतीची अवशेष, प्राण्यांच्या अस्थी आता बर्फ झपाट्याने वितळत असल्याने मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या वस्तूंमुळे नॉर्वेचा इतिहास आणि वंशशास्त्र समजण्यास मदत होणार आहे. मात्र, वातावरणातील बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे या सर्व वस्तूंना धोका असल्याचा इशारही संशोधकांनी दिला आहे.

काही दशकांपासून नॉर्वेतील पहाडांवरील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत आहे. 2020 मध्ये सॅटेलाइट छायाचित्रआंवरून 10 निवडलेल्या बर्फाच्या नगातून 40 टक्क्यांपैक्षा जास्त बर्फ वितळला आहे. हा धोक्याचा इशारा असल्याचे पुरातत्व संशोधक बिरगित स्कार यांनी सांगितले. बर्फाचे हे थर पहाडावरील उंच ठिकाणी बनतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा बर्फ उन्हाळ्यातही पूर्णपणे वितळत नाही. हिमनगांमुळे हे स्थिर राहतात. त्यामुळे याच्या खाली दबलेल्या वस्तू हजारो वर्षे सुरक्षित राहतात. मात्र, आता झपाट्याने बर्फ वितळत असल्याने योग्य वेळी या वस्तूंचा शोध लागला नाही, तर या वस्तू संरक्षित ठेवण्यात मोठा धोका असल्याचेही संशोधकांनी सांगितले.

जागतिक तापमानवाढीमुळे या गोष्टी योग्य वेळेत सापडल्या नाहीत, तर सध्याच्या तापमानात त्या नष्ट होण्याची शक्यता आहे. 2006 पासून आतापर्यंत सुमारे 364 वर्ग किलोमीटरचा बर्फ वितळला आहे. हा भाग न्यूयॉर्क शहराच्या आकाराचा आहे. त्यामुळे या भागात बर्फाखाली दबलेल्या अनेक वस्तू योग्य वेळेत काढण्याची आणि त्या संरक्षित करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. या वस्तूंमुळे नॉर्वेतील प्राचीन जीवनशैली आणि इतिहास समजण्यास मदत होणार आहे. आता सापडलेल्या 3 हजार वर्षांपूर्वीच्या बूटाबाबत अधिक अभ्यास करण्यात येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.