दूध उत्पादक शेतकऱ्यांना 40 रुपये दर द्यावा! स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 40 रुपये दर द्यावा, राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अन्यथा विधानभवनावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा पुणे जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.

आंबेगाव तालुक्यातील दुधाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव येथे ते बोलत होते. पुढे ते म्हणाले जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारच्या वतीने दुधाच्या दराचा आढावा घेण्यासाठी शासन निर्णय पारित करण्यात आला होता, त्यावेळी सरकारने समिती स्थापन केली होती, दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार होता, परंतु आज पर्यंत पाचवा महिना चालू झाला तरी देखील शासनाने या शासन निर्णयाचा आढावा घेतला नाही. खासगी व सहकारी दूध संघांनी दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा दूध संघाने 3.5 फॅट आणि 8.5 एस एन एफ ला 26 रुपये प्रति लिटर दर जाहीर केला आहे.

खासगी संघांनी देखील कमी झालेल्या प्रत्येक पॉईंटला मोठ्या प्रमाणात कपात करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. राज्य सरकार या सर्व गोष्टींकडे बघ्याची भूमिका घेत आहे. सरकार ने तातडीने यामध्ये लक्ष घालून 34 रुपये शासन निर्णयाप्रमाणे दर शेतकऱ्यांना द्यावा ज्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, सरकारने एक लिटरला पाच ते सात रुपये इतके अनुदान द्यावे.

सरकारच्या राहुरी कृषी विद्यापीठाने गाईच्या एक लिटरचा उत्पादन खर्च 42 ते 43 रुपये इतका दाखवला आहे. एक लिटरचा उत्पादन खर्च जर एवढा असेल तर 26, 27, 28 रुपये दर घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय कसा करायचा? शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक पैसा देखील राहणार नाही. तोट्यामध्ये हा व्यवसाय शेतकऱ्यांना करावा लागेल पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी होऊन या भागात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ शकतात अल्पभूधारक अत्यल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसायावर अवलंबून आहे. ग्रामीण अर्थकारण याच्यावर अवलंबून आहे, म्हणून सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा दहा दिवसांमध्ये सरकारने निर्णय घेतला नाही तर शेतकरी मोठ्या संख्येने गावाकडून मुंबईच्या दिशेने येतील आणि त्या ठिकाणी मंत्रालयावरती धडक देतील. जोपर्यंत सरकार जोपर्यंत सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला.

यावेळी वनाजी बांगर, संतोष गावडे, प्रकाश कोळेकर, संजय पालेकर, संतोष पवार, तुकाराम गावडे, धोंडीभाऊ गावडे, अंकुश गावडे, सुदाम पोखरकर, पोपट गावडे, अभिलाष घेवारी, श्रीकांत पोखरकर, मंगेश बांगर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.