
शिवसेना पक्षप्रमुख, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरांच्या प्रश्नावर एकदा नव्हे तर तीन-तीन वेळा बैठका लावल्या. यामुळे मुंबईतून हद्दपार झालेल्या जवळपास 35 हजारांवरील कामगारांना घरांचा हक्क प्राप्त झाला. त्यांना सन्मानाने मुंबईत आणले आहे, मात्र मिंधे-भाजप सरकारने गिरणी कामगारांची फसवणूक चालवली आहे, अशी टीका शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सारथी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कोल्हापूर-गडहिंग्लज येथे कृषी प्रदर्शन मेळाव्यात अहिर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कोल्हापूर शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उपजिल्हा प्रमुख दिलीप माने, श्रद्धा शिंत्रे, शहरप्रमुख संतोष चिकोडे, मुंबई राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई उपस्थित होते.


























































