
सामना ऑनलाईन, श्रीनगर
कश्मीरात शोपियां जिल्हय़ातील अरहामा गावात आज अतिरेक्यांनी पोलीस पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात चार पोलीस शहीद झाले आहेत. या धुमश्चक्रीत अतिरेक्यांनी पोलिसांकडील तीन एके-47 पळवल्या. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून, अतिरेक्यांच्या शोधासाठी जबरदस्त कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
शोपियां जिल्हय़ातील अरहामा गावात बंदोबस्तावर असलेले पोलीस पथक पोलीस वाहनाची दुरुस्ती करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक अतिरेक्यांनी या पथकावर हल्ला चढवला. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात चार पोलीस गंभीर जखमी झाले. पोलिसांकडे असलेल्या तीन एके-47 हिसकावून अतिरेक्यांनी पळ काढला. या जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी या चौघांना तपासून मृत घोषित केले. इश्फाक अहमद मीर, जावेद अहमद भट, मोहंमद इक्बाल मीर आणि आदील मंजूर भट अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर या भागात ताबडतोब बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे.
बुरहान गँगचा कचरू ठार
आज सकाळी अनंतनाग जिल्ह्य़ात लष्कराशी उडालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिदीनचे दोन अतिरेकी ठार झाले. ठार झालेल्या अतिरेक्यांत बुरहान वाणी गँगचा अल्ताफ अहमद दार ऊर्फ कचरू याचा समावेश आहे. कचरू हा कुलगाम जिल्हय़ाचा कमांडर होता. लष्कराने जारी केलेल्या मोस्ट वॉन्टेड टॉप टेन अतिरेक्यांच्या यादीत कचरूचा समावेश होता. गेल्या पंधरा वर्षांपासून तो हिजबूलसाठी काम करत होता. ठार झालेल्या दुसऱ्या अतिरेक्याचे नाव उमर रशीद वाणी आहे. तोदेखील बुरहान गँगचा असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.


























































