
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील डीजीलॉकर सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून संपलेल्या आर्थिक वर्षांत 2021-22 मध्ये 40 कोटी 41 लाख रूपयांची कमाई झाली आहे. गेल्या 2021-22 या आर्थिक वर्षांत या सेवेने 20 कोटी 92 लाखांची कमाई केली होती. यंदा कमाईत 93 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही नॉन फेअर रेव्हेन्यू उपक्रमात आतापर्यंतची मध्य रेल्वेची सर्वात उत्तम कामगिरी आहे.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रवाशांचे सामान ठेवण्याच्या ‘क्लोक रूम’ मध्ये अत्याधुनिक डीजीलॉकरची सुविधा उपलब्ध केली आहे. या डीजीलॉकर सुविधेत डिजिटल पेमेंटसह आरएफआयडी टॅग आणि क्यूआर कोडद्वारे प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू ठेवता येत आहेत. प्रवाशांना त्यांच्याकडील मौल्यवानची वस्तूंना सुरक्षित ठेवण्यासाठी हवे ते डिजिलॉकर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. डीजीलॉकरच्या वापरासाठी प्रवाशांना रोख रक्कम किंवा डिजिटल पेमेंट मोडने जमा केल्यानंतर हे डीजीलॉकर प्रवाशांच्या वापरासाठी खुले होते. प्रवाशांनी डीजीलॉकरमध्ये सुरक्षित ठेवलेल्या आपल्या मौल्यवान वस्तू पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्कॅनरवर क्यूआर कोड स्कॅन करताच त्यांची वस्तू त्यांना परत मिळत आहे.
एका लॉकरचे 30 रूपये
मध्य रेल्वेवर 560 डिजि लॉकर असून अनुक्रमे सीएसएमटीत 300, दादर येथे 160 आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 100 डिजिलॉकर आहेत. टच करून डिजिलॉक सक्रीय करावे, नंतर नाव,पीएनआर आणि मोबाईल क्रमांक टाकावा. नंतर हव्या त्या आकाराचे लॉकर निवडावे, नंतर पिशवीमध्ये आपल्या सामाना ठेवून ही बॅग डिजिलॉकरमध्ये ठेवावी. दर पिशवीमागे प्रत्येकी 30 रूपये फि भरावी लागणार आहे.































































