उरणमध्ये 400 लिटर गावठी दारू जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

उरण तालुक्यात सुरू असलेल्या गावठी दारू धंद्याच्या विरोधात उरण पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. पोलिसांनी सोमवारी केलेल्या कारवाईत तब्बल 400 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. या दारुची किंमत 32 हजार रूपये आहे. या प्रकरणी दशरथ धाऊजी मते (52 रा.सुरूंगपाडा, जासई, उरण) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस हवालदार संतोष मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर उरणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे आणि जी.व्ही कराड यांच्या पथकाने ही कारवाई केली. भवानी कंटेनर यार्डाजवळ गावठी दारू बनविण्याचा कारखाना होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार निळ्या रंगाचे गावठी दारूचे ड्रम अंदाजे 400 लिटर, दारू बनविण्यासाठी लागणारी लाकडे आणि दारू वाहून नेण्यासाठी आणलेली रिक्षा जप्त केली आहे.