
41वे मराठवाडा साहित्य संमेलन गेल्या मार्चमध्ये देगलूर येथे घेण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाच्या प्रभावामुळे ते स्थगित करावे लागले होते. दीर्घकाळ वाट पाहून अखेर ते रद्द करण्यात आले असून, आता 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी संभाजीनगर येथे आयोजित करण्याचे ठरल्याची माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.
मराठवाड्यातील काही वाङ्मयप्रेमी तरुण प्राध्यापकांनी एकत्र येऊन, ‘लोकसंवाद फाउंडेशन’ या त्यांच्या संस्थेच्या वतीने या संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. त्यांचे हे निमंत्रण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्वीकारण्यात आले होते. काल साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांशी ‘लोकसंवाद फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. राजेश करपे त्यांचे सहकारी डॉ. राम चव्हाण, डॉ. रामचंद्र काळुंखे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. हंसराज जाधव, डॉ. रविकुमार सावंत, प्रा. जिजा शिंदे आणि पत्रकार राम शिनगारे यांनी संमेलनाच्या आयोजनासंबंधी समक्ष चर्चा केली.
कोणताही भपकेबाजपणा न करता कमीत कमी खर्चात साधेपणाने हे संमेलन कसे होईल यावर चर्चा करून कमी खर्चात संमेलन घेण्याचा निर्धार केला. तसेच अगदी कमी दिवसांत म्हणजे शनिवार रविवार दिनांक 25 व 26 सप्टेंबर 2021 ह्या दोन दिवशी हे साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित केले.
‘कोरोना’चे दडपण व कोरोनामुळे असलेले महाराष्ट्र शासनाचे व स्थानिक प्रशासनाचे बैठकव्यवस्थेचे नियम पाळून हे संमेलन घेण्यात यावे ह्या साहित्य परिषदेने दिलेल्या सूचनांचे पालन ‘लोकसंवाद फाऊंडेशन’ ने करण्याचे मान्य केले.
ह्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी देगलूरचे ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे राहतील. ‘लोकसंवाद फाउंडेशन’चे कार्यकर्ते संमेलनाच्या कामाला लागले असून त्यांनी बँकेत संमेलनाचे स्वतंत्र खातेही उघडले आहे आणि दोन दिवसांत जमा केलेला निधी बँकेत ठेवण्यात आला आहे. हे संमेलन धाराशिवप्रमाणेच पूर्णपणे लोकवर्गणीतून घ्यावे असा संकल्प मराठवाडा साहित्य परिषदेच्या व लोकसंवाद फाउडेशनच्या वतीने सोडण्यात आला आहे. त्याला रसिक वाचकांचा यशाशक्ती प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
आज मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या संमेलनाची घोषणा करताना संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली. यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे आणि कार्यकारिणी सदस्य डॉ. रामचंद्र काळुंखे हे उपस्थित होते.




























































