वेस्टर्न एक्सप्रेसवर तीन वर्षांत 161 अपघातांत 42 जणांचा मृत्यू, पीडब्ल्यूडीचे ब्लॅक स्पॉट मनुष्यबळाअभावी असुरक्षित 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रस्ते अपघातात दररोज एकाचा बळी जात असल्याने शहरात वारंवार अपघात घडणाऱ्या 39 अपघात प्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) यादी वाहतूक पोलिसांनी सादर केली होती. यातील सर्वाधिक ब्लॅक स्पॉट पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे ते दहिसर आणि जोगेश्वरी ते दहिसर या भागात असून येथे 2018, 19 आणि 20 अशा तीन वर्षांत 161 वाहन अपघात होऊन तब्बल 42 जणांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे.

हे आहेत धोकादायक स्पॉट

वांद्रे, बीकेसी, खेरवाडी, वाकोला, विलेपार्ले, अंधेरी, पवई, एमआयडीसी, जोगेश्वरी, वनराई, कुरारगांव, समता नगर, दहिसर अशी 16 ठिकाणे अपघात प्रवण आहेत. तसेच एमएसआरडीसीच्या हद्दीतील जे.जे. उड्डाण पूल, माहीम उड्डाणपूल, सायन ते पनवेल महामार्ग येथे पावसाळ्यात वाहन चालविताना चालकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीने सरकारला 2020 रोजी मुंबईतील वाढत्या अपघाती मृत्यूबद्दल शिफारसी व सूचना केल्या होत्या. 2020 मध्ये मुंबईत रस्ते अपघातात तब्बल 166 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून 148 पादचाऱयांचा बळी गेला आहे. यामुळे मुंबईतील वारंवार अपघात होणाऱया स्थळांची यादी जाहीर झाली. वांद्रे ते दहिसर आणि जोगेश्वरी ते दहिसर क्षेत्रात 16 ब्लॅक स्पॉट आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांवर 17 ब्लॅक स्पॉट आहेत. तर मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या मुंबई सेंट्रल कार्यालयाच्या हद्दीत 10 ब्लॅक स्पॉट मोडतात.

  • वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सर्वात धोकादायक
  •  वांद्रे ते जोगेश्वरी व्हाया दहिसर डेंजर
  • तीन वर्षांत 161 वाहन अपघात व 42 मृत्यू
  • मुंबईत 39 अपघात प्रवण क्षेत्रे
  • पश्चिम द्रुतगती महामार्गावर 16 ब्लॅक स्पॉट
  • म्पालिकेच्या हद्दीत 17 ब्लॅक स्पॉट
  • पीडब्ल्यूडीच्या हद्दीत सहा ब्लॅक स्पॉट
  • मुंबई सेंट्रल वाहतूक विभागाचे 10 स्पॉट

प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या हद्दीतील रस्त्यांवर जे.जे.उड्डाणपूल, माहीम उड्डाणपूल येथील ब्लॅक स्पॉटचा धोका कमी करण्यासाठी सूचना फलक, दिशानिर्देशक फलक, रॅम्बलिंग स्ट्रीप्स लावण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यावर 17 ब्लॅक स्पॉटपैकी 10 चे कामकाज ‘ब्लुमबर्ग फिलांत्रापाईस’ पंपनीकडे सोपविले आहे. उर्वरित 7 ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना सुरू आहे. तर पीडब्ल्यूडी विभागाच्या हद्दीतील सहा ब्लॅक स्पॉटच्या जागेवर ब्लिंकर्स लावण्यात आले आहेत. परंतु नोकरभरती न झाल्याने उर्वरित ब्लॅक स्पॉटवर मनुष्यबळाअभावी रस्ता सुरक्षा मानकांप्रमाणे प्रतिबंधक उपाय योजना झाल्या नसल्याचे  उघडकीस आले आहे.