
सामना प्रतिनिधी । आष्टी
आष्टी तालुक्यात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आष्टी तालुक्याला ४४ छावण्याची मंजुरी मिळाली असून काही प्रमाणात का होईना पशुधन सांभाळण्यासाठी बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
आष्टी तालुक्यात एकूण १ लक्ष २४ हजार ५०० जनावराची संख्या असून पशुधनासाठी चारा छावणीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरून होती. आष्टी तालुक्यासाठी ४४ छावण्याची मंजुरी मिळाली असल्याची माहिती तहसीलदार हिरामण झिरवाळ यांनी दिली.
तालुक्यात यंदा दुष्काळ तीव्र झाला आहे. त्यामुळे पशुधन जगवायची चिंता निर्माण झाली होती. आष्टी तालुक्यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा बसत असून कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन छावण्या सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने जनावरांच्या छावण्या सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत.
यापूर्वी तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत छावण्यातून जनावरे जगवली आहेत. यंदाही छावणी चालकाला देण्यात येणारे अनुदान पूर्वीप्रमाणेच म्हणजे मोठ्या जनावरांसाठी सत्तर रुपये तर लहान जनावराला पस्तीस रुपये दिले जाणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीचा विचार करता चारा आणि पशुखाद्याचे वाढते दर, पिण्याची पाण्याची कमतरता यात सत्तर रुपयात खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न छावणी चालकांना पडला आहे. यंदा चाऱ्याची भीषणटंचाई आणि पाणी उपलब्ध करताना छावणी चालकांना कसरत करावी लागणार आहे.
पशुखाद्याचे दर वाढले
सध्या वाळलेला चारा, कडबा तर उपलब्ध नाहीच, पण उसाचे व हिरव्या चाऱ्याचे तसेच पशुखाद्याचे दरही वाढलेले आहेत. शिवाय जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने पाणीही दूरवरून आणावे लागणार आहे. त्यामुळे छावणी सुरू करू; पण सत्तर रुपयात खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न छावणी चालकांना पडला आहे.
या गावांना मिळाली मंजुरी
पांगुळगव्हाण, हिवरा, कडा, हनुमंतगाव, कोयाळ, सुंबेवाडी, पांडेगव्हाण, टाकळसिंग, दादेगाव, जामगाव, कानडी बु., पिंपळा, पिंपरी घुमरी, रुई नालकोल, धानोरा, सुरुडी, पारगाव (जो.), पिंप्री आष्टी, शिराळ, पोखरी, हातोला, शेरी खु., मंगरुळ, भवरवाडी,रुटी, केरुळ, केळसांगवी, चिंचपुर-आष्टाफाटा, दौलावडगाव (मुळेवाडी), चिखली, आष्टा ह.ना., अंभोरा, वाहीरा-2, वाळुंज-2 , वाघळुज, घोंगडेवाडी, शेरी बु, फत्तेवडगाव, घाटा पिंप्री.





























































