अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसह 50 लाखांचा मुद्देमाल जप्त; भोकरदनमध्ये कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी तहसीलदार संतोष गोरड यांनी कंबर कसली आहे. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन हायवा टिप्परसह दोन ट्रॅक्टर ताब्यात घेत वाळूचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वी जवखेडा ठोंबरे येथे पूर्णा नदीपात्रातून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू उपसा करत असताना तहसीलदारांच्या पथकाने दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून त्याच रात्री हसनाबाद मंडळातील शिवारात गिरीजा नदीपात्रातून वाळू उपसा करत असताना तेही विना क्रमांकाचे दोन हायवा टिप्पर पथकाने ताब्यात घेतले आहेत.

जवखेडा ठोंबरे येथे गायरान जमिनीत 60 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे. यासह जवखेडा ठोंबरे मेरखेडा परिसरात बैठे पथक स्थापन करण्यात आले आहे. तर तालुक्यात दैनंदिन पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार गोरडे यांनी दिली आहे.

अवैध वाळूचे साठे जप्त करणार
तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन खंबीर असून वाढत असलेल्या तक्रारीमुळे कारवाईचा बडगा हाती घेण्यात आला आहे. बैठे पथक फिरते पथक रात्रंदिवस फिरत आहेत. शिवाय अवैध वाळूचे साठे आढळल्यास तेही जप्त करण्यात येणार असल्याचे गोरड यांनी सांगितले.