शेतकऱ्यांना फसवून साडेपाच हजार कोटींचा कर्जघोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

परभणीतील गंगाखेड साखर कारखान्याचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करून त्यामार्फत २६ हजार शेतकरी व बँकांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. गुट्टे हे छोटे नीरव मोदी असून त्यांना राजाश्रय मिळत असल्याने ते देश सोडून पळून जाऊ शकतात अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

गुट्टे आणि कुटुंबीयांच्या नावे २२ कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्या फक्त काळा पैसा पांढरा करण्याचे काम करतात असा आरोप मुंडे यांनी केला. गंगाखेड साखर कारखान्याने हार्वेस्ट ऍण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली ६०० शेतकऱ्यांच्या नावे कर्जे काढली. त्यापोटी शेतकऱयांना जी वाहने मिळाली ती या कारखान्याच्या कामासाठी लावली. कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करूनही कारखान्याने त्या रकमा बँकांना परतफेड न केल्यामुळे त्या थकीत झाल्या आणि आता त्या लाखोंच्या वसुलीसाठी शेतकऱयांना बँकांच्या नोटिसा येत आहेत असे मुंडे यांनी सभागृहात उघड केले. या शेतकऱयांच्या तक्रारी पोलीस नोंदवून घेत नाहीत आणि गुट्टेंची माणसेही त्यांना गुंडगिरी करतात असा आरोप मुंडे यांनी केला.
गुट्टे यांनी शून्य उलाढाल असलेल्या त्यांच्या कंपन्यांची बनावट कागदपत्रे बनवून साडेपाच हजार कोटी रुपयांची कर्जे घेतल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले. डीएसकेप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक झाली. त्याच आणि त्यापेक्षा अधिक कलमांखाली गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नाही. त्यांना अटक कधी होणार, असा सवाल करतानाच त्यांची मालमत्ता जप्त करा अशी मागणी मुंडे यांनी केली.

– डीएसकेप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक झाली. त्याच आणि त्यापेक्षा अधिक कलमांखाली गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही त्यांच्यावर अद्याप काहीच कारवाई झाली नाही.