
सामना प्रतिनिधी । जळगाव
जळगाव जिल्ह्यात तस्करीसाठी येणारा ४४ लाख ४७ हजार ५०० रूपये किंमतीचा ५९३ किलो गांजा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने चाळीसगाव शहराजवळील ओझर गावानजीक पकडला आहे. तस्करीसाठी वापरलेली एक इनोव्हा गाडी व एक महिंद्रा कार ताब्यात घेण्यात आली असून तीन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
जळगाव येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना अकोल्याहून अलिशान कार द्वारे गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव गाठुन सापळा लावला. चाळीसगाव नजीक असलेल्या ओझर गावाजवळ एमएच १५ जीएल १६५१ या क्रमांकाची इनोव्हा कार व एमएच १४ एएन ६५३२ या क्रमांकाची महिंद्रा कार अडवुन पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी दोन्ही कारमध्ये ५९३ किलो गांजाचे घबाड आढळुन आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पोलीस कारवाई दरम्यान चार जण पसार झाले. दरम्यान पोलिसांनी चाळीसगाव येथील मराठा मंगल कार्यालयाजवळ राहणारा शुभम किरण राणा, चामुंडा माता मंदिरा जवळ राहणारा भुषण केशव पवार तर भुसावळच्या जुना सातारा कडू प्लॉट भागातील रवींद्र गुलाबराव शिंदे या तिघांना ताब्यात घेवुन अटक केली. बाजार भावानुसार या जप्त केलेल्या गांजाची किंमत ४४ लाख ४७ हजार ५०० रूपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कारची किंमत २३ लाख रूपये असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा गांजा नेमका कुठून आणण्यात येत होता आणि कुठे विक्री करण्यासाठी नेला जात होता याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


























































