खासगी वाहन दरीत कोसळून कश्मीरात 6 ठार, 1 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू आणि कश्मीरातील राजौरी जिल्ह्यात खासगी वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 6 जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली.

राजौरी जिल्ह्यातील दरहाल परिसरातील उझान-धांडकोटे येथे एका वळणावर खासगी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन खोल दरीत कोसळले. मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान हा अपघात झाला. स्थानिकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातील लोकांना बाहेर काढले. या भीषण अपघातात चारजणांचा जागीच मृत्यू झाला. इतर तीन गंभीर जखमींना दर्शल येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे आज सकाळी जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला तर एका जखमीला जम्मूला हलवण्यात आले.