दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाचा निर्णय, साहित्य संमेलनाच्या जेवणावळीत यावेळी गोडधोड नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्य संमेलन म्हटले की, भव्य व्यासपीठ, विस्तीर्ण सभामंडप, आकर्षक विद्युत रोषणाई असा मोठा डामडौल असतो. अगदी साहित्यिक आणि रसिकांना गुलाबजाम, श्रीखंड, पुरणपोळय़ा, जिलेबीची मेजवानी मिळते. यंदा पुण्यात होणाऱया शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या जेवणावळीत गोडधोडाला कात्री लावण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा महामंडळाचे कोषाध्यक्ष व ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांनी आज केली.

कल्याणच्या राममारुती महाराज सभागृहात 16 वे नांदी संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात बोलताना निफाडकर यांनी सांगितले की, राज्यात भयानक दुष्काळ असून साहित्य संमेलनात अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात 28 ते 31 जानेवारीदरम्यान चार दिवस हे संमेलन भरणार आहे. शंभरावे संमेलन असल्याने महाराष्ट्रासह देशभरातील मराठीप्रेमी हजारोंच्या संख्येने येणार आहेत. त्यादृष्टीने महाराष्ट्र साहित्य परिषद व महामंडळ आयोजन करीत आहे. पण दुष्काळ आणि पाणीटंचाईचे सावट लक्षात घेत गोडधोड पदार्थांवरील अनावश्यक खर्च टाळून साधे जेवण दिले जाणार आहे.

उपेक्षित साहित्यिकांचा करणार सत्कार

पुण्यातील शंभरावे संमेलन ऐतिहासिक ठरणार असून आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या साहित्यिकांना विशेष निमंत्रण देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाच्या पदाधिकाऱयांनी दिली.