कर्जाच्या आमिषात फसला, सात लाख गमावून बसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

समाज कल्याण विभागाकडून ५० टक्के अनुदान असलेले ४० लाखाचे कर्ज मिळवून देतो असे सांगून ७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ३ जणांना अटक करण्यात आली आहे. शेख जावेद शेख इब्राहीम (४३), अब्दुल रज्जाक मेमन कच्छी आणि शेख नजिर शेख बशीर (रा. टिपू सुलतान चौक मिर्झा गल्ली, वसमत, जि. हिंगोली) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्याच्या निजामाबाद येथील एका सेवानिवृत्त रहिवाशी सय्यद साजीद अली आणि सजय्द दस्तगिर अली (६०) यांची भेट नांदेडच्या शादुल्ला हॉटेल जवळ सन २०१६ मध्ये आरोपींसोबत झाली. त्यावेळी चर्चेत आमची समाज कल्याण विभागात भरपूर ओळख आहे अशी हुल या तिघांनी त्यांना दिली. ५० टक्के अनुदान असलेले ४० लाख रुपयांचे कर्ज तुम्हाला मिळवून देतो, त्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागेल असे त्यांनी सांगितले. सन २०१६-१७ या एका वर्षाच्या कालखंडात या तिघांनी साजीद अलीकडून ७ लाख रुपये उखळले. काही दिवसानंतर या तिघांनी साजीद अलीला समाज कल्याण विभागाचे ४० लाख रुपये कर्ज मंजूर झालेले पत्र दिले आणि सोबतच एस.बी.एस. बॅंकेचे दोन डी.डी.च्या झेरॉक्स प्रती दिल्या. या पत्राची आणि डी.डी.ची शाहनिशा केली असता ते बनावट असल्याचे कळताच साजीद अलीने तक्रार दिली. पोलिसांनी काहीच केले नाही म्हणून न्यायालयात दाद मागितली.

न्यायालयाने या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर २० जानेवारी २०१८ रोजी वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके, पोलीस निरिक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विक्रम हराळे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास केला होता. त्यांनी वसमत येथून या तिन्ही आरोपींना अटक केली.