
बृहन्मुंबईतील 58 बंद पडलेल्या गिरण्यांमधील यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्याकरिता म्हाडातर्फे कालबद्ध विशेष अभियान सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या विशेष अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण 99 हजार 041 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 74 हजार 913 अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र-अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. या अभियानाला गिरणी कामगार व वारसांचा वाढता प्रतिसाद बघता या अभियानाला 14 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.























































