मिलन सब वे यावर्षी पूरमुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास नेहमीच डोकेदुखी ठरणारा मिलन सब वे या वर्षी पूरमुक्त होणार आहे. मिलन सब वेत तुंबणारे पाणी उपसून साचवण्यासाठी बांधण्यात येणाऱया भूमिगत टाकीचे बांधकाम 75 टक्के पूर्ण झाले असून मार्चपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे या वर्षी भूमिगत टाकीचा वापर पूर्ण क्षमतेने करता येणार आहे. त्यामुळे सांताक्रुझ परिसरातील रहिवाशांसह हजारो वाहनचालकांची गैरसोयीतून सुटका होणार आहे. दरम्यान, या टाकीच्या वाढीव कामामुळे कामाचा खर्च 15 कोटी 96 लाख 56 हजार 501 रुपयांनी वाढला आहे.

अतिवृष्टीत मुंबईत विविध ठिकाणी पाणी तुंबल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने भूमिगत टाक्यांचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे हिंदमाता, गांधी मार्केट ही दरवर्षी पाणी तुंबणारी ठिकाणे आता पूरमुक्त झाली आहेत. याच प्रकारे मिलन सब वेमध्ये साचणारे पाणी उपसून साठवण्यासाठी पालिका तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेची महाकाय टाकी जवळच्याच लायन्स क्लब मैदानात बांधणार आहे. 8 एप्रिल 2022 पासून हे काम सुरू करण्यात आले आहे. 70 मीटर – 55 मीटर आकाराच्या या जलाशयाची खोली सुमारे 10.5 मीटर आहे. या टाकीचे 75 टक्के काम झाले असून स्लॅबचे काम बाकी आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल.

दोन तास मुसळधार पडला तरी नो टेन्शन
मिलन सब वे येथील साठवण जलाशय हे सुमारे दोन कोटी लिटर क्षमतेचे आहे. त्यामुळे या परिसरात सलग दोन तास मुसळधार पाऊस पडला तरी या भूमिगत टाकीत पाणी साठवता येणार आहे.