900 खासगी शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापकांना मान्यता नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील 900 खाजगी विना अनुदानित शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाची मान्यता नसल्याचे समोर आले आहे. यात 261 आयसीएसई, सीबीएसई, आयजी या केंद्रीय मंडळाच्या शाळा, 415 कायम विनाअनुदानित खासगी प्राथमिक शाळांचा समावेश आहे, तर 258 कायम विनाअनुदानित राज्य मंडळाच्या शाळा आहेत.

शालेय शिक्षण विभागाकडे मुंबईतील शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मान्यता घेतली आहे का यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे मुंबई अध्यक्ष नितीन दळवी यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितली होती. या माहितीत ही आकडेवारी समोर आली आहे.

खासगी शाळांत शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱयांची नियुक्ती झाल्यावर त्यांच्या वैयक्तिक मान्यता शिक्षण विभागाकडून घेणे अनिवार्य आहे. याच धर्तीवर शिक्षण विभाग खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वैयक्तिक मान्यता तपासणी घेते. शिक्षण विभागाच्या नियमानुसार ही तपासणी अनिवार्य आहे. या कायद्यानुसार वैयक्तिक मान्यता देताना शिक्षकांची शैक्षणिक पात्रता तपासली जाते. त्याच पद्धतीने मुख्याध्यापकांचीही मान्यता घ्यावी लागते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे समारे आले आहे.