97 वे मराठी साहित्य संमेलन अमळनेरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिह्यातील अमळनेर येथे होणार आहे. यावर साहित्य महामंडळाच्या पुणे येथील बैठकीत आज शिक्कामोर्तब झाले. 1952 साली 35वे साहित्य संमेलन अमळनेरला झाले होते. त्यानंतर सुमारे 70 वर्षांनंतर साने गुरुजींच्या कर्मभूमीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे.

वर्धा येथील 96वे संमेलन संपून अवघे दोन महिने झाले असताना आगामी संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. 97व्या संमेलनासाठी महामंडळाला चार निमंत्रणे प्राप्त झाली होती. यात सातारा, औदुंबर, अमळनेर आणि जालना या चार स्थळांचा समावेश होता. यातून एका स्थळाची निवड करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. यात साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश वंसकर, प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनीताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांचा समावेश होता. या निवड समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, तर सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून समितीने सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि महामंडळाने त्याला मान्यता दिली.

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक पार पडली. या वेळी प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे.जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ.के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत अमळनेर स्थळावर शिक्कामोर्तब करण्यात आले.