शनिवारी मुंबई, पुण्यात पावसाचा अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पावसाळा अधिकृतरित्या सुरू झालाय की नाही असा मुंबईतल्या नागरिकांना प्रश्न पडला आहे. जून महिन्यात पावसाच्या धारांनी चिंब व्हायच्या ऐवजी नागरीक घामाच्या धारांनी चिंब व्हायला लागलेत. पाऊस केव्हा येणार असा प्रश्न पडलेल्या तमाम मुंबईकरांना स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. शनिवारी पावसाची शक्यता असल्याचं स्कायमेटने सांगितले आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेले वारे सध्या पूर्व मध्य प्रदेशाकडून पूर्व विदर्भ ओलांडून तेलंगणाकडे जात आहेत. यामुळे पुढील २४ तासात विदर्भ , मध्य महाराष्ट्र तसेच पुणे येथे ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा स्कायमेटचा अंदाज आहे. हे वारे पुढे दक्षिण कोकण ओलांडून केरळच्या दिशेने वाहणार असल्याने येत्या २४ तासात कोकणमधील पाऊस वाढण्याची शक्यता आहे असल्याचंही या अंदाजात म्हटलंय.