
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त सुबोध कुमार यांनी शनिवारी त्यांच्या पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारल्यानंतर बुधवारी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेत पोलिसांसाठी कडक नियम लागू केले आहेत. बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये जाणाऱ्या तसेच लाच घेताना पकडलेल्या पोलिसांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेत. ‘भ्रष्टाचार व पार्ट्यांपासून दूर रहा आणि कामावर लक्ष द्या’ असा आदेशच त्यांनी या बैठकीत पोलिसांना दिला आहे. त्यांच्या या आदेशामुळे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बुधवारी नायगाव येथील पोलीस कार्यालयात आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी लाच घेणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘मला कोणताही अधिकारी, पोलीस लाच घेतोय, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कारवाईत अडकलाय असे ऐकायचे नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच्या अखत्यारित कोणीही लाच घेत नाही ना याकडे लक्ष द्यावे. लाच घेताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी या बैठकित सांगितले. पोलिसांच्या पेज थ्री पार्टीच्या सहभागाचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला. पेज थ्री पार्ट्यांमध्ये जाणे, बंदूक घेऊन फोटो काढणे देखील यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी त्यांनी बदल्यांवरून तसेच देण्यात येणाऱ्या ड्युटी नाकारणाऱ्या पोलिसांची देखील खरडपट्टी काढली. ‘मर्जीनुसार बदली मिळाली नाही किंवा लो प्रोफाईल भागात ड्युटी लावली तर काही पोलीस अधिकारी आजारी असल्याची कारणे देतात मात्र आता अधिकाऱ्यांना अशी कारणे देता येणार नाहीत. जर त्यांनी दिलेले आदेश पाळले नाहीत तर त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल’ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
ड्युटीबाबतचे कडक नियम लागू करतानाचा त्यांनी पोलिसांना शिस्तीचे देखील धडे दिले. ‘पोलीस खाते हे शिस्तीसाठी ओळखले जाते. त्यामुळे आपला गणवेष हा स्वच्छ व नीट असला पाहिजे. तसेच सुदृढ राहण्यासाठी पोलिसांनी व्यायाम व त्यांच्या डाएटकडेही लक्ष दिले पाहिजे.’




























































