
आशिष बनसोडे, मुंबई
धुळ्यात मुले चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवेने हाहाकार उडाला असतानाच दादर रेल्वे पोलिसांनी मात्र तीन महिन्यांच्या मुलाला चोरून पसार झालेल्या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. आपल्या मैत्रिणीचे बाळ चोरून ते पुण्यातल्या एका दांपत्याला तिने दिले होते. पोलिसांनी तीन महिन्यांच्या गोंडस शुभमला ताब्यात घेऊन पुन्हा त्याच्या आईच्या पदरात दिले.
अमिना ऊर्फ शबाना सिकंदर मल्लपल्ली (४०) असे त्या चोर महिलेचे नाव आहे. विवाहित असलेल्या अमिनाला चार अपत्ये आहेत. ती माहीम दर्गा परिसरात राहते. १६ जून रोजी शबानाने तिची मैत्रीण सीमा मांजरेकर हिला फसवून तिच्या तीन महिन्यांचा मुलगा शुभमला पळवून नेले होते. सीमाने याप्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय फारुख शेख, उपनिरीक्षक होबळे, अंमलदार शशिकांत लोंढे, राजेश भडाळे, दादासो लिंगाळे, विजय शिंदे, सुबक्ती घाडगे, संगीता चिंकणे यांची दोन पथके तयार करून मुलाचा शोध सुरू केला. फलाटावरील सीसीटीव्ही आणि तांत्रिक बाबीचा अभ्यास केल्यानंतर शबाना सोलापूरला गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथक सोलापूरला गेले, पण ती पुण्यात गेल्याचे समजताच पोलिसांनी पुणे गाठून तिला पकडले. चौकशीत तिने शुभमला पुण्यात राहणाऱ्या लक्ष्मी नायडू या महिलेला दिल्याचे सांगितले. मग पोलिसांनी नायडूंच्या घरी जाऊन शुभमला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले.
सिनेमा बघायच्या बहाण्याने…
१६ जूनच्या सकाळी दादरला सिनेमा बघायला जाऊया असा बनाव करून सीमाला ती घेऊन निघाली. तेव्हा शुभम शबानाकडेच होता. दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरील बाथरूममध्ये गेली. हीच संधी साधत शबानाने दुसरी लोकल पकडून पळ काढला आणि माटुंगा स्थानक गाठले. माटुंग्यात ती टॅक्सी पकडून दादर टी.टी.ला गेली. मग शेअरिंग टॅक्सीने ती पुण्याला गेली.
चिठ्ठीवरचा नंबर कामी आला
बेघर असलेली सीमा सीएसएमटी स्थानकात राहते. तेथेच शबाना आणि सीमा दोघी मैत्रिणी बनल्या होत्या. पोलिसांनी एसएमटीमधील बेघर लोकांकडे चौकशी सुरू केली. तेव्हा एका महिलेने तिच्याकडे एका चिठ्ठीवर लिहिलेला मोबाईल नंबर पोलिसांना दिला. त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी कोणताही क्ल्यू नसताना शबानाला शोधून काढले.






























































