लातूर जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना ४० कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

सर्वाधिक सोयाबीन उत्पादन घेणाऱा जिल्हा म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यावर्षी पुन्हा आर.एस.२२८ जातीचे सोयाबीनचे बियाणे पेरणीनंतर उगवलेच नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणाऱ्या संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्याप्रकरणी केवळ व्यापाऱ्यांकडे तक्रारी न करता कृषी विभागाकडेही तक्रारी कराव्यात असे अवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात पदश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यात माहिती देताना विठ्ठल तळेकर यांनी सांगीतले की, मागील तीन वर्षांपासून लातूर जिल्ह्यात डी.एस.२२८ जातीचे बियाणे उगवत नसल्याच्या शेतकऱ्ययांच्या तक्रारी आहेत. पण कृषी विभाग याकडे गांभीर्याने बघत नाही. या बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी थेट बाजारातून सोयाबीन खरेदी करुन ते पिशवीत भरुन बियाणे म्हणून विक्री केलेले आहे. त्यांची उगवण क्षमताच कोणी तपासलेली नाही. २५ किलोची बँग ही २२०० ते २४०० रुपये दराने लातूरात विक्री झालेली आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पण शेतकरी कृषी विभागाकडे याबद्दल तक्रार करत नाही. कृषी विभागाने सर्वच तालुक्याच्या ठिकाणी कृषी साहित्य विक्रीच्या ठिकाणीच काऊंटर उघडून तक्रारी घ्याव्यात अशी मागणी होत आहे.

आर.एस.२२८ जातीच्या या बियाणांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ४० कोटी रुपये खर्च केलेले आहेत. मात्र बियाणे न उगवल्यामुळे ही रक्कम तर वाया गेलेली आहेच.पण शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.