
सामना ऑनलाईन । मुंबई
गृहनिर्माण संस्थांचे आराखडे मंजूर करतानाच ज्येष्ठांसाठी बहुउद्देशीय केंद्रे, पाश्चात्य शैलीची सुलभ स्वच्छतागृहे, न घसरणाऱ्या फरशा, पकडदांडा असलेली स्नानगृहे, स्वच्छतागृहे, आदी बाबींच्या अटी बंधनकारक असतील तसेच निवासी व अनिवासी संकुलात वृद्धाश्रमासाठी अतिरिक्त एफएसआय देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे दिली. प्रत्येक जिह्यात ४ वृद्धाश्रमांसाठी जागा राखून ठेवण्यात येतील. तसेच नगर विकास विभागाने नवीन टाऊनशिप अथवा मोठय़ा संकुलास परवानगी देताना त्यांना वृद्धाश्रम स्थापण्याची सक्ती करणे, तेथे ज्येष्ठ ग्राहकांना तळमजल्यावर घर अथवा गाळे द्यावेत, असे निर्देश नगर विकास विभागास दिल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले असून सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली असल्याचे बडोले यांनी सांगितले.





























































