
सामना प्रतिनिधी, मनमाड
दुष्काळी परिस्थितीमुळे शहरातील आठवडे बाजारावर परिणाम जाणवला आहे. रविवारच्या आठवडे बाजारावरही त्याचे सावट दिसून आले. खरे तर आजचा आठवडे बाजार हा दिवाळीचा बाजार होता. बाजारात दीपोत्सवासाठी लागणाऱया विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या तयार कपडे, किराणा माल, सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ आदी विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. परंतु खरेदीसाठी फारसा उत्साह दिसून आला नाही.
यंदा अपुऱ्या पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम आठवडे बाजारावर झाला. येथील आठवडे बाजारात चांदवड, येवला, नांदगाव तालुक्यातील विविध गावांचा समावेश होता. या तिन्ही तालुक्यांसाठी मध्यवर्ती असल्याने बाजाराला या गावातील शेतकरी, शेतमजूर, कामगार खरेदीसाठी येतात, परंतु दुष्काळी परिस्थितीचा फटका बाजारावर बसल्याने खरेदीदारांची संख्या घटली आहे. या तीनही तालुक्यांतून मजुरांचे स्थलांतर होत असल्याने दिवाळीच्या बाजारावरही त्याचा परिणाम झाला.
summary- weekly market in shadow of drought at manmad



























































