
सामना ऑनलाईन । जयपूर
देशात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वारे वाहत आहे. पक्षा-पक्षात आणि पक्षांतर्गत वादांमुळे हे या निवडणुकांची चर्चा आहे. राजस्थान काँग्रसेमध्ये असाच पक्षांतर्गत वाद आणि तिकीट वाटपाचे राजकारण समोर आले आहे. काँग्रेसच्या कार्यालयातच तिकीट विक्रीचे पोस्टर लागल्याने पक्षाची चांगलीच फजिती झाली आहे.
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि जयपूर येथे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमधून काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांच्यावर तब्बल 3.5 कोटी रुपयांत निवडणुकीचे तिकीट विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. शैलजा यांच्यासोबत पोस्टरवर अन्य एका महिलेचा फोटो देखील दिसत आहे. पोस्टरवर लिहिले आहे की, फलौदी मतदारसंघासाठी माजी संसदीय सचिव विजयलक्ष्मी बिश्नोई यांना काँग्रेसचे तिकीट 3.5 कोटी रुपयांना विकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पोस्टरची माहिती भाजपला मिळाली आणि मग या पोस्टरचा फोटो व्हायरल झाला.
मात्र शैलजा यांच्यावर लावण्यात आलेला तिकीट विक्रीचा आरोप खोटा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी म्हटले आहे. तिकीट वाटपाचे काम पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

























































