
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यात 2017-18 या वर्षात 44 हजार 698 शाळाबाह्य मुले आढळल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक आहे.
बहुसंख्य शाळाबाह्य मुले ही शहरी भागातील आहेत. मुंबईत शाळा सोडणाऱ्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. विविध कारणांनी स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या मुलांना त्यांच्या मूळ ठिकाणी नियमित शिक्षण घेण्यासाठी हंगामी वसतिगृह योजना राबविली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर बीड जिह्यातील शिरूर येथे ही योजाना राबविली जात असून ही योजना यशस्वी झाल्यास आगामी वर्षांपासून ती संपूर्ण राज्यात राबविली जाणार आहे.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हमीकार्ड आणि हंगामी वसतीगृह योजना राबविण्यात येत असून या योजनेत चंद्रपूर जिह्याचे काम चांगले आहे. पालघर जिह्याने शाळा व्यवस्थापन समितीच्या तालुका स्तरावरील मेळाव्यातून शाळाबाह्य मूलविरहीत जिल्हा करण्याचे उद्दीष्ट ठरविले आहे. तर जालना जिह्याने जिल्हातंर्गत स्थलांतर रोखण्यात 100 टक्के यश मिळविले असून या जिह्याप्रमाणे इतर जिह्यांनीही शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी करावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षण परिषदेने केले आहे.






























































