
सामना ऑनलाईन, मुंबई
गोवर आणि रुबेला लसीकरणासाठी आता शालेय शिक्षण विभाग चांगलाच दक्ष झाला आहे. ही मोहीम राज्यभरात कशी यशस्वीपणे राबवता येईल यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. लसीकरणाच्या दिवशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्के राहील याची काळजी शाळा व्यवस्थापन समितीने घेण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाकडून सर्व जिल्हा परिषद, नगर परिषद, तसेच मनपा शाळांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या 27 नोव्हेंबरपासून राज्यभरातील शाळांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. मात्र बऱ्याच शाळांमध्ये लसीकरणाच्या दिवशी विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हे पाऊल उचलले आहे. लसीकरण कसे सुरक्षित आहे याची माहिती पालकांना करून द्यावी तसेच या लसीकरणाची माहिती केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटना यांना वेळोवेळी ऑनलाइन मिळावी यासाठी सरल प्रणालीच्या माध्यमातून स्टुडंट पोर्टलवर याची नोंद ठेवण्यात यावी अशी सूचनाही शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.



























































