
सामना ऑनलाईन । पणजी
गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी परराज्यातील नागरिकांचा घाटी असा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका व्हायला सुरुवात झाली. या मुद्द्यावरून वाद चिघळण्याची शक्यता दिसताच आपल्या विधानापासून यू टर्न घेत त्यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. घाटी हा अपशब्द नसून घाटावर राहणाऱ्यांना घाटी असे म्हटले जाते असेही त्यांनी सांगितले. या शब्दातून कोणचाही अपमान करण्याचा आपला उद्देश नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परराज्यातील घाटींनी रोजगार मिळवण्यासाठी गोव्यात येऊ नये, नोकऱ्यांमध्ये गोव्यातील स्थानिकानांच प्राधान्य देण्यात येईल असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यातील घाटी या शब्दामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली. यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसताच त्यांनी माघार घेत हा अपशब्द नसल्याची सरवासरव केली आहे. आरंबोळ, केरी, मांद्रेव आणि अश्वेल या समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छतेसाठी परराज्यातील नागरिकांची निवड झाल्याच्या मुद्द्यावर ते बोलत होते. आता समुद्रकिनारा स्वच्छतेचे काम कंत्राटदाराला तात्पुरत्या स्वरुपात दिले आहे. त्यांनी ही परराज्यातील नागरिकांची भरती केली आहे. नव्या कंत्राटदाराच्या नियुक्तीची प्रक्रिया सरू आहे. नवा कंत्राटदार आल्यावर त्यांना स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यास सांगण्यात येईल. त्यामुळे परराज्यातील लोकांनी रोजगारासाठी गोव्यात येऊ नये. स्थानिकांना प्राधान्य दिल्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास त्यांचा विचार करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक बाजापेठेतील मंदीचा गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. रशियातील चनलाचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात घसरल्याने रशियाच्या पर्यटकांमध्ये मोठ्या संख्येने घट झाल्याचे ते म्हणाले.































































