
सामना प्रतिनिधी । जामखेड
जामखेड येथील बीड रोडवरील जुन्या शासकीय दुध केंद्राजवळील रोडच्या कडेला एका पस्तीस वर्षे वयाच्या इसमाचा मृतदेह आढळुन आला आहे. सदर इसमाजवळ एक औषधाची बाटली आढळुन आली असल्याने त्याने आत्महत्या केली सल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जामखेड- बीड रोड वरील जुन्या शासकीय दुध केंद्राजवळ एका इसमाचा मृतदेह आढळुन आला आहे. ही घटना पोलिसांना समजल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे घटनास्थळी आले व मृतदेहाची पहाणी केली. यावेळी मृतदेहाजवळच एक विषारी औषधाची बाटली अढळुन आली असून त्याच्या खिशात कडा ते जामखेड असे एस.टी. बस चे तिकीट आढळून आले आहे. त्यामुळे ही व्यक्ती बीड जिल्ह्य़ातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून सदरचा मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. मृत व्यक्तीसंदर्भात कोणास अधिक माहिती मिळाल्यास तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला ०२४२१-२२१०३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी केले आहे.





























































