
सामना प्रतिनिधी । देवरूख
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे चित्रित करण्यात आलेल्या चंद्रप्रभा एंटरटेन्मेंटच्या रमेश मोरे दिग्दर्शित ‘महाराजा’ चित्रपटाची सिंधुदुर्ग व अहमदाबाद येथे होणाऱ्या बालचित्रपट महोत्सवासाठी व कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. अंधश्रद्धा आणि वृक्षसंवर्धन या विषयावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांसोबत येथील स्थानिक कलाकारांनाही रमेश मोरे यांनी संधी दिली आहे.
कोकणच्या निसर्ग सौंदर्याची चित्रपट सृष्टीला चांगलीच भुरळ पडली असून अनेक दिग्गज निर्मात्यांनी कोकणात चित्रपट तयार केले आहेत. दिग्दर्शक रमेश मोरे यांनी कोकणातील अनेक समस्यांना हात घालत कोकणात हाक, चिरंजीवी, आनंदी यासारखे अनेक चित्रपट चित्रित केले आहेत. या चित्रपटातून त्यांनी कोकणातील विनाशकारी प्रकल्प, अंधश्रद्धा अशा अनेक विषयांवर प्रकाशझोत टाकला आहे. काही महिन्यांपुर्वी रमेश मोरे यांनी डॉ. भगवान नारकर यांच्या माध्यमातून कडवई येथे चंद्रप्रभा इंटरटेन्मेंटच्या ‘महाराजा’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कडवई परिसरात केले होते. अंधश्रद्धा आणि वृक्षसंवर्धन यावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांसोबत येथील स्थानिक कलाकारांनाही महत्वाच्या भूमिकेत मोरे यांनी संधी दिली आहे .
शंभूराजे मालिकेतील हंबीरराव अनिल गवस, क्राईम पेट्रोल फेम राजू शितप तसेच दादर येथील सरस्वती विद्यालयाच्या प्राध्यापिका मीनल वाघ व बालकलाकार रिया कुलकर्णी तसेच संजीवनी बने (कडवई) हे सर्वजण या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून डॉ. भगवान नारकर (पुजारी) लांजा येथील अमोल रेडीज (तांत्रिक) पत्रकार मिलिंद चव्हाण, तुरळ गावचे पोलीस पाटील संजय ओकटे, अप्पा फडकले या स्थानिक कलाकारांचाही सहभाग आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बौद्धजन विकास मंडळ कडवई बौद्धवाडी, कडवई धामनाकवाडी ग्रामस्थ, राजवाडी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे.





























































