मी चहाबाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– अभिनेत्री, लेखिका शिल्पा नवलकर टेसदार मांसाहार आणि मत्स्याहार विशेष प्रिय… 

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – आयुष्याचा खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा भाग आहे.

खायला काय आवडतं? – चटपटीत आवडतं. मांसाहारात काहीही आवडतं. मासे, चिकन, मटण यातलं मी काहीही आणि कधीही खाऊ शकते.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – काय खाता यापेक्षा किती आणि कधी खाता हे फिटनेसच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे सगळं खाते, फक्त शिस्त पाळण्याचा प्रयत्न करते. रात्री उशिरा काहीही खात नाही. एकाच वेळेस खूप खात नाही. त्यामुळे मला सगळं खाता येतं.

डाएट करता का? – डाएट म्हणजे आपलं खाणं. पण प्लान डाएट करत नाही. माझा सगळं खाण्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझ्या डाएटची व्याख्याच आहे की, ‘तुम्ही कधी आणि किती खाता. याचं नियोजन मी करते. पण खाण्याचं नियोजन करणं या अर्थाने डाएट करत नाही.’

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – आठवडय़ातून दोन किंवा तीन वेळा तरी होतं. तेही रात्री साडेआठच्या आधी होतं. तिथेही काय होतं यापेक्षा किती आणि कधी खाल्लं जातंय याला महत्त्व असतं.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?- मासे खाण्यासाठी ‘गझाली’मध्ये जायला आवडतं. वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी वेगवेगळय़ा ठिकाणी जायला आवडतं.

कोणतं पेय आवडतं? – चहा… मी चहाबाज आहे.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – प्रयोग जर रात्री उशिरा असेल तर त्यानंतर जेवण होणार असेल तर कधी रात्रीचे दीडही वाजू शकतात. अशा वेळी प्रयोगाच्या आधीच काहीतरी हलकं खाऊन घेते. त्यामुळे रात्री उशिरा खाण्याची गरज लागत नाही. जिथे जाईन तिथे त्या गावची खासियत टेस्ट करायला दिवसभरात आवडते. रात्री उशिरा नाही.

दौऱयानिमित्त आवडलेला खास पदार्थ? – बऱयाचदा असं होतं की ज्या गावात आम्ही जातो तिथे असे खाद्यपदार्थ असतात त्याचं नावच ऐकलेलं नसतं. विरारला गेल्यानंतर ‘भुजिंग’ हा चिकन आणि पोह्यांचा प्रकार मी पहिल्यांदा ऐकला. हा पदार्थ मला दुसरीकडे कधी मिळाला नाही.

स्ट्रीट फूड आवडतं का? – खूप आवडतं. त्यामध्ये पावभाजी आणि पाणीपुरी आवडते. पाणीपुरी मी कधीही खाऊ शकते.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – घरचं जेवण जितकं साधं असेल तितकं मला आवडतं. पाठारे प्रभू पद्धतीचे मासे आमच्याकडे शिजवले जातात. ते आवडतं. आमच्याकडे खोबरं न घालता फक्त तेलावर माशाचे सगळे प्रकार बनवले जातात. ‘भुजणं’, ‘खडखडलं’ असे माशाचे प्रकार आमच्याकडे करतात.

– पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खाऊ घालता? – पाहुणे जर मांसाहारी असतील तर मला चिकन खायला घालायला आवडतं. कारण ते सगळय़ांना आवडतं. माशांचे प्रकार आमच्या पद्धतीचे करायला आवडतात. कारण ते दुसरीकडे कुठे केले जात नाहीत. खूप लोकांसाठी पाठारे प्रभू पद्धतीचे मासे हा वेगळा प्रकार आहे, ते मी आवर्जून खायला घालते. कारण ते त्यांना त्यांच्या घरी खायला मिळत नाहीत.

– उपवास करता का? – अजिबात नाही. धार्मिक अर्थाने किंवा फिटनेसच्या अर्थानेही उपवास करत नाही.

खिमा ‘पाय’
साहित्य – अर्धा किलो बटाटे, काळीमिरी पावडर, पाव किलो खिमा, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला पावडर, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे आलं-लसूण पेस्ट, पाव छोटा चमचा हिंग, 2 ते 4 चमचे तेल, 3 कांदे, 2 टोमॅटो (बारीक चिरलेले), 100 ग्रॅम वाटाणा, अर्धा चमचा गरम मसाला, कोथिंबीर, मीठ चवीपुरते.

कृती – खिमा स्वच्छ धुवून त्याला हिंग, आलं-लसूण पेस्ट, हळद लावून कुकरमध्ये शिजवून घ्यावा. एका पातेल्यात तेल टाकून त्यात अख्खा गरम मसाला टाकावा. त्यात कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. टोमॅटो, सर्व मसाला, ओला वाटाणा व मीठ घालून सुके होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर बटाटे उकडून त्यात मीठ, काळीमिरी घालून ते मऊ, एकजीव होईपर्यंत मॅश करावे. बेकिंग ट्रेला आतून तेल लावून घ्यावे. त्यात मॅश केलेल्या बटाटय़ाला एक थर लावावा. त्यावर तयार खिम्याचा एक थर लावावा. त्यावर पुन्हा बटाटय़ाचा एक आणि खिम्याचा एक असे थर लावावेत. वरून कोथिंबीर भुरभुरून ओव्हनमध्ये 25 मिनिटे ठेवावा. बेक झाल्यावर त्याचे त्रिकोणी वा चौकोनी तुकडे काढून गरम सर्व्ह करावा.