
सामना प्रतिनिधी । आष्टी
डोक्यात दांडा घालून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना तालुक्यातील चोभानिमगाव येथे रविवारी घडली असून अनिता पवार (वय 42 वर्षे) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार चिवा जांभुळपाडा (ता. पाली, जि. रायगड) येथील रामा नावोजी पवार व अनिता रामा पवार हे दाम्पत्य तालुक्यातील चोभानिमगाव येथील मच्छिंद्र मानसिंग राठोड यांच्याकडे कोळसा तयार करण्याच्या कामासाठी आले होते.
रविवारी अनिता व रामा या दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून किरकोळ भांडण झाले. रागाच्या भरात रामा पवार याने काम करीत असलेल्या ठिकाणी बाभळीचा दांडा अनिता हिच्या डोक्यात मारल्याने मोठा रक्तस्त्राव होऊन ती जागीच कोसळली. घटनेची माहिती समजताच मच्छिंद्र राठोड व परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मच्छिंद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून रामा पवार याच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास ताब्यात घेतले आहे.



























































