
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर गांधी भवनासाठी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातर्फे भेटवस्तू दिलेल्या खुर्च्या व टेबल घेऊन गेले. त्यामुळे आघाडीच्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला अखेर राष्ट्रवादी भवनमध्ये आघाडीचा मेळावा घेण्याची वेळ आली.
शहागंजमधील काँग्रेस पक्षाच्या गांधी भवन कार्यालयात कार्यकर्त्यांसह पदाधिकारी, मान्यवरांना बसण्याकरिता जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी प्लास्टिक खुर्च्या व टेबल हे भेटवस्तू म्हणून दिले होते. जिल्हाध्यक्ष असल्यामुळे सत्तार यांची गांधी भवनात रेलचेल होती. परंतु संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज झालेले जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताच सत्तार यांनी गांधी भवनात कार्यकर्त्यांना बसण्यासाठी दिलेल्या तीनशे प्लास्टिक खुर्च्या व टेबल घेऊन गेले.
गांधी भवनातील खुर्च्या, टेबलची पळवापळवी झाल्याने काँग्रेसचे पदाधिकारी गोंधळून गेले. गांधी भवनातील हॉल ओस पडला. बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांना गांधी भवनाऐवजी हडकोतील राष्ट्रवादी भवनमध्ये आघाडीचा मेळावा घेण्याची वेळ आली.
या संदर्भात आमदार अब्दुल सत्ता प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गांधी भवनामध्ये कार्यकर्त्यांना बसण्यासाठी दिलेल्या तीनशे खुर्च्या व टेबल मी परत घेऊन गेलो.’


























































