
सामना प्रतिनिधी । नगर
डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी भाजप खासदार दिलीप गांधी हे मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली. अखेर आज खुद्द सुजय विखे पाटील यांनीच दिलीप गांधी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीप गांधी यांच्याशी चर्चा केली होती आणि ती चर्चा सकारात्मक झाल्याचे दिलीप गांधी यांनी सांगितले होते. दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण त्याच बैठकीमध्ये गांधी यांनी मी पक्षाचेच काम करणार असे जाहीर करून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, असे स्पष्ट सांगत बंडखोरीची तलवार त्यांनी स्वतःहून म्यान केली होती.





























































