
सामना प्रतिनिधी, सोलापूर
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. यासंदर्भातील आवश्यक ती कागदपत्रे शासनाने वेळोवेळी न्यायालयात सादर केली आहेत. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही क्षणी लागू शकतो, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दाखल होणाऱयांची संख्या मोठी आहे. मात्र आपण केलेल्या गैरकारभारातून आपल्याला मुक्ती मिळावी, असे कोणीही समजू नये. छगन भुजबळ दोन वर्षे जेलमध्ये जाऊन आले आहेत. अजित पवार यांच्या सिंचन घोटाळय़ाचा खटला न्यायप्रविष्ट आहे. शासनाने याबाबतची आवश्यक ती कागदपत्रे न्यायालयाकडे सादर केली आहेत. त्यामुळे हा निर्णय कोणत्याही क्षणी लागू शकतो. अजित पवारांवरील खटला न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत आता बोलणे उचित होणार नाही. देश घटनेवर चालतो. चौकशी पूर्ण झाली की कारवाई होणारच, मग तेथे चंद्रकांत पाटील असो किंवा सुभाष देशमुख, असेही ते म्हणाले.
संजय शिंदे यांना किंमत मोजावी लागेल
माढय़ातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी ऐन वेळी भूमिका बदलली. त्याची त्यांना किंमत मोजावी लागणार आहे. शिंदे यांनी त्यांच्या साखर कारखान्यात सामान्य शेतकऱयांच्या सातबारावर कोटय़वधींची कर्जे उचलली आहेत. या प्रकरणी सरकारने चौकशी सुरू केली आहे. हे प्रकरण सहकार खात्या अंतर्गत येत असल्याने त्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख खंबीर असून ते यात लक्ष घालतील. मात्र ज्याप्रमाणे शेतकऱयांच्या नावावर कर्जे घेणाऱया रत्नाकर गुट्टे याला तुरुंगात जावे लागले त्याच धर्तीवर संजय शिंदे यांना तुरुंगवारी करावी लागेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.



























































